अज्ञात वेडसर व्यक्तीसाठी तो बनला ‘ देवदूत ‘

ग्रामीण प्रतिनिधी :महेश शेंडे विठ्ठलवाडा
गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा या गावात कुठलही समाजकार्य असो की गावाजवळ कुठलाही झालेला अपघात असो वा गावात कुणालाही आर्थिक अडचण असो त्याला माहित झालं की तो सर्वात समोर जाऊन काम करणारा अशी गावभर ख्याती असलेला युवक म्हणजे टिकू भाऊ डाहुले.हा युवक कार्य करताना कधीच जात – पात, धर्म – पंथ, गरिब – श्रीमंत असा भेदभाव न करता सढळ हाताने मदत करतो.
मागील पाच ते सहा महिन्यांपासून असाच एक वेडसर व्यक्ती विठ्ठलवाडा येथील बस स्टॉपवर प्रवासी निवार्यामध्ये राहत आहे.कुणी त्याला खायला अन्न दिले तर खायचे आणि प्रवासी निवार्यामध्ये जाऊन झोपायचे असा त्याचा दिनक्रम चालू होता.प्रवासी निवार्याच्या आजुबाजूलाच तीन ते चार हॉटेलचे दुकान आहेत.तो वेडसर व्यक्ती निवार्यात राहत असल्याने हॉटेल व्यावसायिक सुद्धा त्याला हॉटेल मधले पदार्थ खायला देत होते.त्यामुळे तो तिथेच रमला होता.
पण कालांतराने अचानक त्याच्या पायाला काय झाले कुणास ठाऊक त्याचे पाय हळु हळु खराब व्हायला लागले, त्याला खूप असह्य वेदना होत होत्या त्यामुळे त्याच्या जवळ कुणीच जात नव्हते.ही बाब गावातील युवक टिकू भाऊ डाहुले याला माहीत होताच त्याने त्याची विचारपूस करत त्याच्या शरीराची तपासणी केली असता त्याचे पाय पूर्णतः सळू लागले आहेत असे त्याच्या निदर्शनास आले.तेव्हा त्याने स्वतः त्याचे पाय स्वच्छ करून त्याच्या पायाला औषधी लावून मलमपट्टी करून दिले.त्या वेडसर व्यक्तीस गँगरीन हा आजार आहे असे समजताच पुढील उपचारासाठी त्याला मेडिकल कॉलेज नागपूरला नेण्याचे ठरविले आहे.









