पाथरी ग्रामीण रुग्णालयाची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून आकस्मिक पाहणी

सुविधा सुधारण्याच्या सक्त सूचना
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमवार यांनी शुक्रवारी पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयाला आकस्मिक भेट देऊन विविध विभागांची सखोल पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील काही बाबींवर त्यांनी असमाधान व्यक्त करत तत्काळ सुधारणा करण्याच्या लेखी व तोंडी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

भेटीदरम्यान डॉ. लखमवार यांनी रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्था, बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), ऑपरेशन थिएटर, नवजात शिशू विभाग, प्रसूती कक्ष (डिलिव्हरी रूम) तसेच इतर आरोग्य सेवा विभागांची पाहणी केली. रुग्णांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्यसेवा मिळावी तसेच रुग्णांसोबत सौजन्याने व्यवहार करण्याबाबत व सर्व सुविधा कार्यक्षम ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विशेषतः, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना अनावश्यकपणे परभणी येथे संदर्भित (रेफर) न करता शक्य त्या सर्व प्रसूती ग्रामीण रुग्णालयातच करण्यावर भर द्यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
रुग्णालय परिसरात कायमस्वरूपी स्वच्छता राखणे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेवर उपस्थित राहणे तसेच दिवस-रात्र रुग्णांना तत्पर, गुणवत्तापूर्ण व संवेदनशील आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, अशा सक्त सूचना डॉ. लखमवार यांनी यावेळी दिल्या.
रुग्णालयातील सेवा अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि रुग्णाभिमुख करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.









