रेल्वे प्रश्नावर खासदारांची बैठक
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत सर्व खासदारांची 30 सप्टेंबर रोजी रेल्वे प्रश्नावर बैठक होणार आहे. तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातील विविध रेल्वे प्रश्नांवर ही बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे या बैठकीस महत्व प्राप्त होत आहे.
दरम्यान, या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार श्रीमती फौजिया खान यांनी मंगळवारी (दि.03) मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाच्या पदाधिकार्यांबरोबर हितगुज केले व त्यांच्याद्वारे रेल्वे विषयक प्रश्न जाणून घेतले. यात नांदेड-पुणे या मार्गावर दिवसा एक्सप्रेस सुरु करावी, नांदेड-वास्को(गोवा) नवीन गाडी सुरु करावी, कोविडपूर्व नांदेड-औरंगाबाद एन्टरसिटी गाडी पुन्हा सुरु करावी, पुणे तसेच पनवेल एक्सप्रेसला कायमस्वरुपी तीन कोचेस जोडावेत, औरंगाबाद-अकोला, पंढरपूर-शेगांव नवीन गाड्या सुरु कराव्यात, रायचूर-परभणी, पटना-पूर्णा रेल्वेचा विस्तार जालना पर्यंत करावा, परभणी रेल्वे स्थानकावर अमृत भारत योजनेंतर्गत कामे सुरु करावीत, प्लॅटफार्म क्रमांक 4 व 5 ची उभारणी करावी, सर्व प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृह उभारावेत, पिण्याचे पाणी, डिस्प्ले बोर्ड, नवीन पादचारी पुलास भिंत पाडून बाहेर जाण्यास रस्ता यासह अन्य मागण्यांसंदर्भातही तपशीलवार चर्चा करण्यात आली.
यावेळी सुरेश नाईकवाडे, बाळासाहेब देशमुख, महेश पाटील, कदीर लाला हाशमी, माणिक शिंदे, दत्तराव कर्हाळे, रुस्तुम कदम, पी.आर. देशमुख यांच्यासह अन्य उपस्थित होते.