आदिवासी दिनानिमित्त चितारले क्रांतीकारकांचे पेंटिंग

परमानंद तिराणिक यांचा चित्रातून अस्मिता जागर….
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
९ आँगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून जगभरातील आदिवासी बांधव खेड्यापाड्यात मोठ्या उत्साहाने साजरा करतात. संयुक्त राष्ट्र संघटनेने हा दिवस जागतिक आदिवासी दिवस घोषित केल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनन्य साधारण असे आहे. आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचे संरक्षण व्हावे, त्यांचा जल – जंगल व जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा, त्यांची विशिष्ट संस्कृती, ओळख, अस्तित्व , आत्मसन्मान, अस्मिता कायम राहावी, यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांची आवश्यकता लक्षात घेऊन हा दिवस साजरा करण्यात येतो. दरम्यान, या दिनचे औचित्य साधून आदिवासी कला संवर्धन समितिचे जिल्हाध्यक्ष कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांनी क्रांतिकारकांची पेंटिंग साकारली आहे.
ज्या क्रांतीकारकांनी ब्रिटिशांविरूद्ध लढताना आदिवासींनी शंभरपेक्षा अधिक लहान मोठे सशस्त्र संघर्ष केला या संघर्षामध्ये अनेक आदिवासी वीर हुतात्मा झाले. इ.स. १७८५ ला बिहारमध्ये तिलका मांझी हा ब्रिटिश विरूद्ध संघर्ष करून फासावर गेला. त्यासारखे जल – जंगल, जमीन या लढासाठी आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा हे सुद्धा फासावर गेले असेच सिधू संथाल , राघोजी भांगरे , श्यामा दादा कोलाम, तंथ्या भिल्ल , राणी दुर्गावती, बाबुराव शेळमाके, अश्या क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देवून वीरमरण पत्करले. तेव्हापासून आदिवासींच्या लढ्याचा धगधगता इतिहास सुरू आहे. १४५० पासून तर स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत निरनिराळ्या प्रदेशातील आदिवासीवीरांनी स्वातंत्र्यासाठी उठाव, चळवळी केल्या, ब्रिटिशांशी संघर्ष केले, पण त्याची दखल इतिहासात नाही. म्हणून भारताच्या निरनिराळ्या भागात इंग्रजांविरुद्ध झालेल्या लढ्यात योगदान तेवढेच महत्वपूर्ण राहिले. त्यामुळे या क्रांतिकारकांचे परमानंद तिराणिक यांनी चितारलेले पेंटिंग साक्षात चित्रातून आदिवासींची अस्मिता जागर करण्यात आल्याचे दिसून येते.