रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न बनत आहे गंभीर

वाहनचालक त्रस्त
रस्त्यांच्या रखडलेल्या कामांना मुहूर्त केव्हा?
प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी
लाखणी तालुक्यातील पालांदूर(चौ) परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनत आहे.
परिसरात सूरु असेलल्या जड वाहतूकीमुळे व मागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे.त्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. रस्ते एकदाचे कधी दुरुस्त होतात असा प्रश्न वाहनधारकांसह नागरिकांना पडला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना खड्डेमुक्तिची प्रतीक्षा आहे. रस्त्यांच्या रखडलेल्या कामांना मुहूर्त केव्हा मिळेल?असा प्रश्न परिसरातील नागरिकांसह दुचाकी व चारचाकी वाहनचालक विचारताना दिसत आहेत.
सध्यास्थितीत ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली आहे. रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
खड्डेमय रस्त्याने वाहने चालविताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. मध्यंतरी पावसाळा सुरू असल्याने रस्त्यांचे काम करता येत नव्हते. आता पावसाळा संपून दोन महिने उलटले असून आता तरी कामाला सुरुवात करावी असा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
वाहन चालकांची कसरत
पालांदूर-जेवनाळा-गोंडेगाव या रस्त्याचे डागडुजीचे (पॅचेस) काम मागील वर्षी करण्यात आले होते. त्याचप्रमाणे गुरढा ते गोंडेगाव ह्या रस्त्यावरील रुंदीकरण देखील करण्यात आले.
या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तालुक्याला दुचाकीने जात असताना वाहने चालन करताना वाहनधारकांना अनेक अडचणी येत आहेत. रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.खड्ड्यांतून मार्गक्रमन करतांना दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामीण परिसरातील सर्वच रस्त्यांवर अशा प्रकारचे खड्डे दिसून येतात.
पालांदूर-ढिवरखेडा-वाकल- हरदोली रस्त्याने चालणेही झाले कठीण
पालांदूर-ढिवरखेडा-वाकल-हरदोली रस्त्याने तर साधे चालणेही कठीन झाले आहे.पायी चालणाऱ्यासह वाहनधारकांना खड्ड्यांमुळे गैरसोय सहन करावी लागत आहे.
खड्ड्यांची दुरुस्ती करण्याबाबत अनेकदा संबंधित प्रशासनाकडे मागणी करण्यात आली असल्याचे समजते. मात्र दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळन झाली आहे.
वाहन चालवित असताना एक खड्डा चुकवला तर दुसरा पुढे आहेच. त्यामुळे खड्डे चुकवावी तरी किती? असा प्रश्न वाहनधारकांना पडत असतो.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.