ताज्या घडामोडी

हॅम्बरिंग न करता सागवान लाकडांची केली इतरत्र वाहतूक

लाकूड व्यवसायिक आणि वन अधिकाऱ्याचे संगनमताची गावकऱ्यांमध्ये चर्चा

प्रतिनिधी:नरेन्द्र मेश्राम लाखनी

घरगुती उपयोगाकरिता शेतातील वृक्ष तोडून वाहतूक करण्याबाबद शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असल्या तरी त्यास तिलांजली देऊन वनअधिकारी आणि लाकूड व्यवसायिकांचे संगनमताने नियमबाह्य काम केल्याचा अफलातून प्रकार दिघोरी/ मोठी वनरक्षक बीटात उघडकीस आला. शेतात कापलेली सागवान प्रजातीची लाकडे सहाय्यक वनसंरक्षक यांचेकडून हॅम्बरिंग न करता तसेच वाहतूक परवाना ( टीपी) वनविभागाने उपलब्ध केला नसताना इतरत्र वाहतूक केली असल्याने ते लाकूड जप्त करावे अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे .
घरगुती कामाकरीता , फर्निचर तयार करण्यासाठी अथवा घर बांधकामाकरिता उपयोगात आणण्यासाठी शेतातील वृक्ष तोडावयाची असल्यास अनुसूचित असलेल्या वृक्षांना तोडण्याची परवानगी वनविभाग तर आडजात वृक्षांना महसूल विभागाकडून परवानगी दिली जात असली तरी शेतकऱ्यांचे नावावर लाकूड व्यवसायिक , वनअधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगनमताने हा गोरखधंदा अनेक वर्षापासून सुरू असला तरी चुकीची झळ मात्र कारण नसताना शेतकऱ्यांना सहन करावी लागते . वनरक्षक बीट दिघोरी/ मोठी येथील गट क्रमांक ३८२ आराजीं ०.८० आर मधील १४० सागवान वृक्ष तथा गट क्रमांक ३७५ आराजी ०.६० आर मधील ९० सागवान वृक्ष अशी एकूण २३० वृक्ष कापण्याकरिता शेतकरी विजय चंद्रय्या गैनवार पालांदुर यांनी विहित नमुन्यात अर्ज करून वन परिक्षेत्र अधिकारी लाखांदूर यांना सागवान वृक्ष तोडून वाहतूक करण्याची परवानगी ऑक्टोंबर २०२१ मध्ये मागितली होती . कागदोपत्री अर्ज शेतकऱ्यांचे नावाने असला तरी ही सागवान वृक्ष पालांदुर / चौरास येथे फर्निचरचे काम करणाऱ्या एका लाकूड व्यवसायिकास विकण्यात आले . त्याने वनविभागाकडे वृक्ष तोडण्याची परवानगी मागितल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
क्षेत्र सहाय्यक दिघोरी/ मोठी यांनी वनरक्षकासह मौका चौकशी करून पंचनामा केला तथा पुढील कार्यवाहीस वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठविला . कार्यालयीन बाबीची पूर्तता झाल्यानंतर परवानगी मागितलेल्या २३० सागवान वृक्ष कापण्याची परवानगी देण्यात आली . त्यानुसार ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत वृक्ष कापून हॅम्बरिंग न करता विना क्रमांकाचे निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरने वाहतूक करण्यात आली . नियमाप्रमाणे परवानगी देण्यात आलेली वृक्ष कापल्यानंतर मोक्यावरच ठेऊन सहाय्यक वनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून थुट आणि कापलेल्या झाडांवर हॅम्बरिंग करून वाहतूक परवाना उपलब्ध झाल्याशिवाय वाहतूक करता येत नाही पण दींघोरी / मोठी गट क्रमांक ३८२ मधील कापलेल्या सागवान वृक्षांची स्थानिक वन कर्मचाऱ्यांचे संगनमताने वाहतूक करण्यात आली . हॅम्बरिंग न करता विना परवानगीने इतरत्र वाहतूक केलेली सर्व वृक्ष जप्त करावी अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे.
सरकारी जागेवरील वृक्षांची कत्तल – दिघोरी / मोठी गट क्रमांक ३८२ आराजी ०.८० आर चे पूर्वेस पालांदुर ते वडसा हा राज्यमार्ग असून उत्तर ,पश्चिम आणि दक्षिणेस चराईसाठी मुकरर असलेले गट क्रमांक ३८० आणि ३८३ आहेत. या शेतकऱ्याने सरकारी जागेवर अतिक्रमण करून सागवान वृक्षांची लागवड केली होती त्याच वृक्षांची कत्तल केली गेली असून वस्तुस्थिती समोर आणण्याकरिता गट क्रमांक ३८२ चे पुन्हा सर्व्हे होणे गरजेचे झाले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close