ताज्या घडामोडी

मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे कधी भरणार ?आमदार सत्यजीत तांबे ची मागणी

आ. सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली चिंता.

प्राध्यापकांच्या रिक्त पदांबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र.

शालेय शिक्षणमंत्र्यांकडेही केली मागणी .

विविध विभागांमधील प्राध्यापकांच्या भरतीची मागणी

मुख्यमंत्र्यांसह शालेय शिक्षणमंत्र्यांनाही पाठवलं पत्र

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

१६५ वर्षांपेक्षाही प्रदीर्घ ज्ञानदानाची परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठातील अनेक महत्त्वाच्या विभागांची अवस्था सध्या बिकट आहे. अर्थशास्त्र, गणित, भूगोल, इतिहास, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा अनेक विभागांमध्ये प्राध्यापकांची पदे ५० टक्क्यांपेक्षा जास्त रिकामी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असून विद्यापीठातील संशोधनाचा दर्जाही घसरला आहे. या प्रश्नी आता आमदार सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेतला असून ही पदे लवकरात लवकर भरावी, अशी मागणी करणारं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांसह शालेय शिक्षणमंत्र्यांनाही पाठवलं आहे.

मुंबई विद्यापीठ हे देशातील एक अग्रणी विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचं नाव जागतिक पातळीवरही अभिमानाने उच्चारलं जातं. या विद्यापीठाला १६५ पेक्षा जास्त वर्षांचा देदिप्यमान इतिहास आहे. पण सध्याची अवस्था अत्यंत बिकट असून ज्ञानदानाचं काम करणाऱ्या प्राध्यापकांचीच उणीव आहे. विद्यापीठातील १० महत्त्वाच्या विभागांमध्ये ५८ टक्क्यांपेक्षा जास्त प्राध्यापकांची पदं रिक्त आहेत. हे विद्यापीठासाठी आणि राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेसाठी नक्कीच भूषणावह नाही, असं आ. सत्यजीत तांबे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

विद्यापीठांमधील प्राध्यापक फक्त मुलांना शिकवण्याचंच काम करत नाहीत. ते आपापल्या विषयांमध्ये मौलिक संशोधनही करत असतात. कोणत्याही विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या या संशोधनांमुळेच त्या विद्यापीठांचा दर्जा उंचावतो. पाश्चात्य देशांमध्ये विभागांमधील प्राध्यापक ज्ञानदानासह आपल्या विषयाच्या संशोधनातही व्यग्र असतात. आपल्याकडेही अनेक विद्यापीठांमध्ये हे चित्र दिसतं. पण त्यासाठी एखाद्या विभागात प्राध्यापकांची मंजूर पदं भरलेली असणं आवश्यक आहे. समजा विभागात प्राध्यापकांची संख्या कमी असेल, तर त्या प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यावरच भर द्यावा लागतो. त्यांना आपल्या विषयातील संशोधनासाठी वेळच उरत नाही, अशी खंत आ. तांबे यांनी व्यक्त केली.

अर्थशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, लॉ, मानसशास्त्र, इतिहास, भूगोल, इंग्रजी, गणित, राज्यशास्त्र या ज्ञानाच्या प्रमुख शाखा आहेत. याच विभागांमध्ये ५८ टक्के पदं रिक्त असणं हे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासाठी अजिबातच भूषणावह नाही. त्यामुळे उच्च शिक्षणमंत्र्यांनी या गोष्टीची तातडीने दखल घेऊन प्राध्यापकांची रिक्त पदं भरण्याच्या दृष्टीने योग्य पावलं उचलावी, अशी विनंतीही आ. तांबे यांनी केली आहे.

‘… ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी’
मुंबई विद्यापीठाचा दर्जा कायम राखणं नाही, तर तो सुधारणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या विद्यापीठाचा आवाका खूप मोठा आहे. देशात आपल्या या विद्यापीठाचा नावलौकिक आहे. पण गुणात्मक संशोधनात आपण मागे राहिलो, तर ते भविष्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरेल. तसंच त्यामुळे प्राध्यापकांची प्रगती खुंटेल आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणावरही होणार आहे. त्यामुळे हा दर्जा कायम राखणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. – आ. सत्यजीत तांबे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close