ताज्या घडामोडी

दिल्लीत पार पडला भारतीय साहित्य अकादमीचा “वार्षिक महोत्सव”

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

लिहीत्या हाताला शब्दांची साथ लाभली की, आशयघन कलाकृती तयार व्हायला वेळ लागत नाही. असंच लिहिता लिहिता हळूहळू मग मनाला सुखद आनंद देणारी साहित्याची अनुभूती यायला लागते. साहित्य हा एक प्रवाह आहे.न थांबणारा न आटणारा.परंतु साहित्याची अभिजात आणि खरीखूरी ओळख ही साहित्य अकादमीच्या दिल्ली येथील रविंद्र भवनात गेल्यावर साहित्य अकादमीच आपल्याला नकळत करून देते. ते कुणाला विचारावं लागत नाही. भारतीय साहित्य अकादमी म्हणजे खोल गडद निळाशार महासागरा सारखे एक विशाल ग्रंथ भांडार आहे. त्याची उंची , विस्तार , व्यापकता ,महत्त्व आणि उपयोगीता किती मोठी आहे, याची आपण कल्पना करू शकत नाही. जसे वाचन हे मनाचे अन्न आहे.तसेच लेखन हे अंतःर्मनातील कल्पीत भावनांचे सृजन आहे आणि ते खूप व्यापक आहे. भारतीय साहित्य अकादमी झेप घेणाऱ्या पाखरांना सदैव उडण्यास बळ देत असते.साहित्य अकादमी व सांस्कृतिक मंत्रालयात भारत सरकार द्वारा दिल्ली येथील रवींद्र भवन येथे आयोजित “वार्षिक महोत्सव” नुकताच दि.11 ते 16मार्च 2024 या कालावधीत पार पडला.यावेळी भारतातील 1100हून अधिक विद्वान , साहित्यिक ,कवी उपस्थित होते. सन 2023 च्या वेगवेगळ्या 24 भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीं म्हणून निवड झालेल्या 24 साहित्यिकांना साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सुप्रसिद्ध उर्दू लेखक ,गीतकार ,कवी गुलजार यांचे ‘संवत्सर व्याख्यान’ या कार्यक्रमात ‘सिनेमा आणि साहित्य’ या विषयावर व्याख्यान झाले.150 सत्रातून 700हून अधिक कवींनी आपापल्या मातृभाषेतून कविता सादर केल्या.यावेळी 175 बोली भाषीकांचा सहभाग होता .
‘नरसी मेहता’ सभागृहात आदिवासी कविसंमेलनात दि.15मार्च 2024 ला ठिक 2:30 ते 4:00 वा.च्या सत्रात महाराष्ट्रातील मालती मडावी -सेमले यांनी दोन कविता प्रथमतः गोंडीतून व नंतर हिंदीतून अशा सादर केल्या. यावेळी ‘मोहफुल ‘ या त्यांच्या कवितेतून ‘मोहफुले वेचणारी माझी माय’ तर ‘तो कसला रे माणूस’ या कवितेतून ‘गडचिरोलीचे भग्न होत चाललेले जंगल’ हे दोन विषय होते. या सत्राचे अध्यक्ष ए.आर गोविंदस्वामी (लंबाडी) आणि सहभागी कवी ,कविता कुसुगल (बेडा),गीता पुजारी (भोत्रा),अनिमा तेलरा बिरजिया (बिरिजिया),सोलोनी बारेह (खासी),रोशन जंम्बू (कोरकू),रघुनाथ मडकामी (कोया),नारायन उराव (कुडूख), मालती सेमले व जोराम ताना( न्याशी) हे होते.
कविता एक विचार आहे विचारक्रांती आहे. प्रत्येक कवितेत भाव व दृष्टी जुळलेली असते. आदिवासींच्या जीवनात नाचगाणी ,पंचायत,शिकार याला खूप महत्त्व आहे.आदिवासी जीवन प्राणी ,पक्षी ,झाडेवेली ,नदी ,डोंगर पहाड यांच्याशी जुळलेले आहे. आदिवासी स्त्री हीच या देशाची पहिली शेतकरी आहे. इथल्या प्रत्येक उद्योजकाचे जनक आदिवासीच आहेत.आदिवासी संस्कृती ही या देशाचा मुलाधार आहे. असे अनेक विचार अध्यक्षांच्या भाषणातून या वेळी उपस्थितीतांना ऐकायला मिळाले.भारतातील विविध प्रांतातील आदिवासी साहित्यिकांनी आपापली वेशभूषा परिधान करून आपापल्या भाषेचे प्रतिनिधित्व करीत असले तरी आपण सगळे एक असल्याचा आनंद मात्र नक्कीच सर्वांच्या मनामध्ये होता. गतवर्षी आँगस्ट मध्ये साहित्य अकादमी व सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार द्वारा ‘भोपाळ’ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बहुभाषिक साहित्य संमेलनात सुद्धा कविता सादर करण्याची मालती सेमले यांना संधी मिळाली होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close