ताज्या घडामोडी

करोडो रुपयांचे हॉस्पिटल निर्माण करण्याची कहाणी; एक स्वप्न साकार….! -वनिता पंडित,पुणे

प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी

समाजात अनेक अनिष्ठ गोष्टी घडतात. जिथे कुठे अन्याय होईल, अत्याचाराच्या घटना घडतील त्याविरुद्ध आवाज उठविणारे उमदे तरुण नेतृत्व म्हणून उमेश चव्हाण यांना पुणे शहरात ओळख मिळाली, नव्हे त्यांनी ती निर्माण केली. सुरुवातीची काही वर्षे एका राजकीय पक्षामध्ये पुणे शहर अध्यक्षपदी काम केल्यानंतर त्यांनी सन २०१६ पासून स्वतःचे संघटनात्मक कार्य सुरू केले. शोषित पीडितांच्या न्याय – हक्कासाठी एका आंदोलकाच्या भूमिकेतून त्यांनी राज्यभर समविचारी समर्थक कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आणि त्यातूनच रुग्ण हक्क परिषद या संघटनेचा जन्म झाला.
पैशा अभावी रुग्णांचे थांबविले जाणारे उपचार, रोखल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया, केवळ पैसे नाहीत, म्हणून लोक मरत आहेत अशा घटना घेऊन ज्यावेळी लोक रुग्ण हक्क परिषदेकडे येऊ लागले तेव्हाच रुग्णांच्या हक्काची चळवळ महाराष्ट्रभर उभी राहिली. याआधी सर्वांच्याच संघटना होत्या. कामगारांच्या- रिक्षाचालकांच्या अगदी कागद-काच-पत्रा वेचणाऱ्या पासून ते हमाला पर्यंत सर्वांच्याच संघटना होत्या. डॉक्टरांची संघटना, नर्सिंग पॅरामेडिकल लोकांची संघटना, औषध बनविणाऱ्यांची, औषध विक्रेत्यांची संघटना, हॉस्पिटल चालकांची संघटना, हॉस्पिटल मालकांची संघटना मात्र संघटना नव्हती ती रुग्णांची! उमेश चव्हाण यांनी जगातील पहिली रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी रुग्ण हक्क परिषद स्थापन केली आणि रुग्ण हक्क परिषदेकडे लोकांचा वाढता सहभाग वाढू लागला. रुग्णांच्या न्याय हक्कासाठीचे लढे क्रांतीकारी लोकशाही मार्गाने जिल्ह्याजिल्ह्यात लढले जाऊ लागले, त्याचे सर्व श्रेय जाते ते उमेश चव्हाण यांनाच!
लाखो रुग्णांना योग्य किमतीत उपचार दिले गेले पाहिजेत. मोफत उपचारासाठीचे सर्व प्रयत्न सरकारने केले पाहिजेत. या महत्त्वाच्या मागण्या बरोबरच रुग्णांच्या हक्काचा – न्यायाचा कायदा झाला पाहिजे. यासाठी रुग्ण हक्क परिषद जोरदारपणे आपली ठाम भूमिका स्पष्ट करत होती. सुरुवातीला रुग्ण हक्क परिषद नेमकं काय काम करते? हे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे थेट चौथ्या फळीतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटना मार्गक्रमण करत राहिली. मात्र पुढे पुढे बुद्धिवंत, उद्योजक, उच्चशिक्षित, डॉक्टर, वकील, प्राध्यापक संघटनेत येऊन स्वतःहून जबाबदाऱ्या पार पाडू लागले. सर्वांनाच उमेश चव्हाण यांचे विचार पटत आहेत. एका योग्य व्यक्तीच्या नेतृत्वाखाली – सहवासात काम करण्याचा आनंदही लोकांना मिळत आहे.
रुग्णांचे हक्क मिळविण्यासाठी अनेक दिवस शासन दरबारी मागणी करत असताना आणि जनतेच्या पैशावर – देणग्यांवर उभ्या राहिलेल्या धर्मादाय रुग्णालयांकडे आपला हक्क मागत असतानाच रुग्ण हक्क परिषदेने रुग्णांच्या न्याय हक्काचे उपचार देणारे हॉस्पिटल निर्माण करून एक यशस्वी मॉडेल उभे करायचे. असा विचार अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या मनात आला. गेली दोन वर्ष ते त्यासाठी विचार करत होते. प्रयत्न करत होते. यातून मुंबई – शिरवळ – शिरूर येथे हॉस्पिटल उभे करण्याचा प्रयत्नही झाला. उमेश चव्हाण प्रयत्न करायचे. मात्र त्यावेळी सोबत असलेले सहकारी तितके मजबूत आणि कार्यक्षम नसल्यामुळे फक्त हॉस्पिटल सुरू होणार असा गाजावाजा व्हायचा. आणि लोक हसायचे. आणि काही फक्त मिरवून घेणारे सहकारी साथ सोडून द्यायचे. खरंच रुग्ण हक्क परिषदेचे हॉस्पिटल निर्माण होणार का? असा लोकांना प्रश्न पडायचा. मात्र एप्रिल २०२१ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा डॉक्टर नाहित. नर्स नाहीत. बेड नाही. ऑक्सिजन नाही. रेमडेसिविर नाही. वेंटीलेटर नाही. असा नाही चा पाढा सुरू झाला. भयानक भीषण सत्य समोर यायला लागले. दररोज मृत्यू आणि श्रद्धांजलीचे फोटो पोस्टर दिसायला लागले.
खरंतर कोरोनावर औषध नाही, असे म्हणणारे लोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे होत होते. कोरोनामुळे लोक मरतात मात्र त्याहीपेक्षा कैकपटीने अधिक लोक योग्य वेळी औषधोपचार घेऊन बरे देखील होतात. हे गेल्या एक वर्षभरात उमेश चव्हाण यांनी नोंदवलेले महत्त्वाचे निरीक्षण होते. लोक बेड मिळत नाही. इंजेक्शन मिळत नाही. हॉस्पिटल उपलब्ध होत नाही, म्हणून ‘पॅनिक’ होत आहेत. त्यामुळे उमेश चव्हाण यांनी तब्बल पन्नास लाख रुपये उभे केले. धानोरी येथे तात्पुरत्या स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलची निर्मिती केली. शेकडो जणांना त्यामध्ये मोफत उपचार दिले. बेड मिळणारच नाहीत म्हणून अनेकांना वाटणारी भीती कमी केलीच. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलमध्ये एकही मृत्यूची नोंद झाली नाही. अवघ्या सहा दिवसात हॉस्पिटल उभे राहिले. त्यातूनच उमेश चव्हाण यांचा आत्मविश्‍वास वाढला. त्यांनी कोंढवा येथे कायमस्वरूपी “आरएचपी हॉस्पिटलची” केलेली निर्मिती पाहून अनेकांना या ध्येयवेड्या युवा नेत्याचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. आरएचपी हॉस्पिटल अत्यंत सुंदर अत्यंत देखणे अगदी पंचतारांकित आहे. स्वतःचे – हक्काचे आपल्या मालकीचे हॉस्पिटल त्यांनी उभे केले. पहिल्या टप्प्यात यातील चाळीस बेड सुरू करण्यासाठी सज्ज आहेत.
“आरएचपी हॉस्पिटल” महाराष्ट्र राज्यामध्ये आदर्श रुग्णसेवा करणारे महत्त्वाचे आदर्श मॉडेल तर होईलच यात शंका नाही, मात्र आपण जे स्वप्न बघतो आणि त्या स्वप्नासाठी निश्चित केलेल्या ध्येया यानुसार जर वाटचाल केली, तर यश मिळतेच! हे उमेश चव्हाण यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. कोंढवा येथील “आरएचपी हॉस्पिटल” मध्ये आपण नक्कीच जाऊन आले पाहिजे. आणि हा प्रकल्प आपण समजून घेतला पाहिजे. रुग्ण हक्क परिषदेचे कौतुक केले पाहिजे. रुग्णांच्या हक्कांसाठी लढा उभ्या करणाऱ्या एका विस्थापित संघटनेला सुद्धा हॉस्पिटलची मालकी निर्माण करणारी प्रस्थापित संघटना होता येतं! हे मुळात काही साधे काम नाही. १ जुलै २०२१ रोजी या हॉस्पिटलचे उद्घाटन उमेश चव्हाण यांच्यच हस्ते होणार आहे. या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्याच पाहिजेत.
तुम्हाला ”आरएचपी हॉस्पिटलच्या” इमारतीची रचना, कौशल्यपूर्ण देखणं रूप असणारे बांधकाम आणि उभारणी, कलात्मक रंगसंगतीमुळे तिथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना या प्रसन्नपणानेच बरे वाटेल! याची किमान खात्री पटवून घेण्यासाठी तरी आपल्याला पुण्यातील कोंढव्यात जाऊन “आरएचपी हॉस्पिटल” बघितलेच पाहिजे. होय आणि जमले तर तन – मन- धनाने मदतही केली पाहिजे.
– वनिता पंडित, पुणे

rhp_hospital #आपलंस्वतःचहक्काचंहॉस्पिटल #रुग्णहक्कपरिषद #CovidHospital #rugnhakkparishad #उमेशचव्हाण #छत्रपतीशिवाजीमहाराजहॉस्पिटल #मोफतउपचार #कोरोनामोफत_उपचार #रुग्णहक्कपरिषदकार्यालय #umeshchavan

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close