बालविवाहमुक्तीसाठी तालुकास्तरीय चँम्पीयन्सची नियुक्ती करणार
- जिल्हाधिकारी आचल गोयल
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला बालविवाहमुक्त परभणी अभियानात सहभागी करून घेतले आहे. आता यापुढे सर्व विभागांकडून जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रत्येकी १० असे एकूण ५० चँम्पिअन्सची नियुक्ती करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज येथे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संदीप घोन्सीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके, शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड, उपशिक्षणाधिकारी धनराज येरमाळ, अरविंद आकांत, जिल्हा समन्वयक विकास कांबळे यांच्यासह बालविवाह निर्मूलन समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
बालविवाहमुक्त अभियानात सहभागी पंचायत विभाग, शिक्षण, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग व जिल्हा महिला व बालविकास यांच्यामार्फत नियुक्त करण्यात येणाऱ्या चॅम्पिअन्सची नावे व संपर्क क्रमांक तात्काळ कळविण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी विभागप्रमुखांना यावेळी दिल्या. त्याचबरोबर जिल्हा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मूल्यमापन आढावा गुगल फॉर्म १०० टक्के भरण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यांचे निराकरण करून एकत्रित माहिती भरण्यासाठी हे चॅम्पियन्स सक्रिय राहतील, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थी व पालक यांना बालविवाह या विषयावर संवेदनशील करणे तसेच चाइल्ड लाईन १०९८ क्रमांकाविषयी माहिती देणे आणि लिंगभाव समानतेविषयी प्रशिक्षण देण्यासाठी बालक व पालकसत्र घेण्यात येणार आहेत. इयत्ता सहावीच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी ही सत्रे राहणार असून, विद्यार्थी व पालक सत्रासाठी प्रत्येकी १५ असे एकूण ३० शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षित शिक्षकांमुळे बालविवाह होण्याची शक्यता असणाऱ्या भागात बालविवाह निर्मूलन करण्यास मदत होईल. तसेच तेथील बालकांचे प्रश्नही जाणून घेता येतील, असेही त्यांनी सांगितले.
‘सक्षम युवाशक्ती’ हा कार्यक्रम युवकांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून, यामध्ये बालविवाह याविषयी पथनाट्य, लिंगभाव समानतेचे खेळ, मानवी शृंखला, बालविवाहमुक्तीची शपथ देण्यात येणार असून, किमान १५ ते २० गावांमध्ये सुरुवातीला हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी सांगितले.
परभणी जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ५७ बालविवाहांची माहिती महिला व बालविकास विभागाकडे १०९८ आणि इतर स्त्रोतामार्फत मिळाली. त्यापैकी ४५ बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले असून, यापैकी २५ प्रकरणांची माहिती बाल कल्याण समितीकडे सादर करण्यात आली आहे. तर ४५ कुटुंबांचे याबाबत समुपदेशन करण्यात आले आहे. बालकल्याण समितीकडे सहा बालविवाहांच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
यापुढे बालविवाह निर्मूलनासाठी सर्व संबंधित विभागांनी सकारात्मक यशकथा प्रत्येक महिन्याला देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच बालविवाह निर्मूलनाबाबतची माहिती भरणे, ती अद्ययावत करून संकेतस्थळावर प्रकाशित करण्याची सूचना जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी बैठकीत दिली. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेवर बालरक्षक शिक्षकाचे नाव व संपर्क क्रमांक रंगवणे अनिवार्य केले असून, त्यामुळे विद्यार्थिनींना माहिती देणे सोपे होणार आहे. यासोबतच ‘ट्रॅक द गर्ल’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक किशोरवयीन आणि इतरही मुलींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करण्याबाबतचे नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासनाला शाळाबाह्य मुलींची माहिती मिळणार आहे सोबत मुलींची शालेय शिक्षणातील गळतीही थांबविण्यात येणार असून, त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे सोईचे होणार आहे. वाहतुकीची साधने नसलेल्या गावातील मुली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडू नयेत, यासाठी लवकरच राज्य परिवहन मंडळाच्या अधिका-यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले .