ताज्या घडामोडी

उद्योजकांसह संबंधित अधिकाऱ्यांनी उद्योग वाढीसाठी प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी जिल्ह्यातील सर्व उद्योजक, निर्यातदार यांनी उद्योग संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान रोजगारनिर्मिती व मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून नवउद्योग सुरु करावेत. तसेच नवउद्योजकांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नवउद्योजकांसह उपस्थितांना केले.


जिल्ह्यातील उद्योजकांचे व्यवसाय अडचणीत आल्यामुळे त्यांच्या संपत्ती जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये 5 लाखापासून ते 3 कोटी रुपयापर्यंतचे भांडवल उपलब्ध करून देण्यात आले होते. केवळ उद्योजक घडवून उपयोग नाही जर जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी हातभार लावावा. उद्योग -व्यवसाय डबघाईस येण्यामागील कारणांचा शोध घेण्यात यावा. त्यामुळे नवउद्योजकांसह संबंधित अधिका-यांनी यातील अडचणी शोधण्याचे काम प्राधान्याने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात नवउद्योजकांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे बोलत होते.
येथील जिल्हा उद्योग केंद्रामार्फत एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र शासनाची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी इग्नाईट महाराष्ट्र-2024ची एकदिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळा आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या कार्यशाळेस नांदेड उपविभागीय कार्यालयाचे अमोल इंगळे, मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी पी. बी. हजारे, निर्यात सल्लागार अमोल मोहिते, सीडबीच्या सहायक व्यवस्थापक श्रीमती क्षीतिजा बलखंडे, डाक कार्यालयाचे निरीक्षक संदीप लोखंडे, न्यू इंडिया इन्श्युरंस कंपनीचे अनिल जाधव, ध्रुव पारेख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे, उद्योग निरीक्षक आर. डी. जोंधळे, एस. एम. दुलेवाड, अभिजीत लांडे, मिटकॉनचे जिल्हा समन्वयक श्रीकांत मानोलीकर, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी काशिनाथ राठोड, रोजगार व स्वयंरोजगार, कौशल्य विकासचे सहायक आयुक्त प्रशांत खंडारे, ‘माविम’चे बाळासाहेब झिंजाडे, नांदेडचे विभागीय अधिकारी धनाजी इंगळे, विनोद इंगळे, अमोल इंगळे, श्री. गौतम कुमार, इंडीया पोस्ट श्री. कुशवाह, सुरेश पवार, सीडबी, आय.डी.बी.आय. कॅपिटल यांच्या सहकार्याने निर्यातदार उद्योजक, औद्योगिक समूह, बँकर्स, फार्मर प्रोड्यूसर कपंनी इत्यादी उपस्थित होते.
जिल्ह्यातील एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी सद्याची आव्हाने, संधी व धोरणे यांची माहिती जिल्ह्यातील उद्योजक, निर्यातदार व स्टेक होल्डर्स यांना देण्याकरीता आज या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संघटना व संस्था, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी उत्पादक सहकारी संस्था, शेतीमाल उत्पादक संस्था, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधीत उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचलन समितीचे सदस्य, संशोधक व बँका यांना आमंत्रित करण्यात आले होते.
परभणी जिल्ह्याचा विकास इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी झाला आहे. कृषिप्रधान जिल्हा असून देखील मोठ्या उद्योगांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी इतर मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये उद्योगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविणे अत्यंत आवश्यक असून, त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवरच काम मिळू शकेल, असे जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी सांगितले. जिल्ह्यात निर्यातक्षम उद्योग उभारणीस मोठा वाव आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातून डबाबंद मांस, प्लास्टीक रोप्स, कॉटन इ.निर्यात होत असून, मराठवाडा विभागामध्ये हा जिल्हा निर्यातीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असल्याबाबत त्यांनी अभिनंदन केले.
जिल्ह्यातील नव उद्योजकांनी उद्योग सुरु करताना परिपूर्ण अभ्यास करुनच उद्योगांची सुरवात करावी, जेणेकरुन उद्योग चालू झाल्यानंतर बंद पडणार नाही असेही त्यांनी नमूद केले. याबाबत जिल्हा उद्योग केंद्र व शासकीय यंत्रणांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. तसेच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग वाढीसाठी सर्व संबंधीत यंत्रणांनी प्रयत्न करावेत, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीस वाव मिळून जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींचे इतर ठिकाणी स्थलांतर होणार नाही असे सांगितले.
मैत्री कक्षाचे पद्माकर हजारे, डीजीएफटीचे ध्रुव पारेख यांनी जिल्ह्यातील उद्योजकांना सविस्तर मार्गदर्शन केले, सीडबीचे सहायक व्यवस्थापक क्षीतिजा बलखंडे यांनी सीडबीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या वित्त पुरवठ्याबाबत मार्गदर्शन केले, विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगरचे अमोल मोहिते यांनी जिल्ह्याचा एक्सपोर्ट अॅक्शन प्लॅन सादर केला.
यावेळी उपस्थित नवउद्योजक, उद्योजकांनी त्यांच्या नियमित कर्जाचे हप्ते भरल्यानंतरही शासकीय अनुदान मिळत नसल्याचे सांगितले असता यावर तात्काळ मार्ग काढण्यात येईल असे संबंधित बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील निर्यातदार औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी, औद्योगिक समुहाचे प्रतिनिधी, फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे पदाधिकारी, नवउद्योजक, निर्यातदार उद्योजक, जिल्ह्यातील औद्योगिक समुहाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री.एस.एच.पवार यांनी आभार मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close