ताज्या घडामोडी

राष्ट्रीय शहिदवीर बाबुराव शेडमाके

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

इतिहासाला 1857 चा उठाव माहीत आहे..त्यानंतर क्रांतीची मशाल पेटवणा-या क्रांतीवीरांची नावे माहीत आहे..परंतु त्याही आधी इंग्रजाच्या जुलमी राजसत्तेला टक्कर देणाऱ्या क्रांतिवीरांची माहीती नाही..हे खरच दुर्दैव आहे..असे कित्येक क्रांतिवीर..ज्यांची भारतीय इतिहासाने दखल घेतली नाही..त्यापैकीच एक देशभक्तीने पेटलेला, अन्यायाने चिडलेला .. लढता – लढता फाशीवर चढणारा योद्धा शहीदवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांची 21 आँक्टोबर ही पुण्यतिथी.
वीर बाबुराव शेडमाके यांचा जन्म 12 मार्च 1833 मध्ये दक्षिण गोंडवानाच्या ( पूर्व विदर्भाच्या ) अहेरी जमीनदारीत शेडमाके घराण्यात झाला.. त्यांच्या वडीलांचे नाव पुल्लेसूर..तर आईचे नाव जुरजाकुँवर असे होते.. वडील अहेरी जमीनदारीचे मालक होते..पुल्लेसूर व जुरजाकुँवर यांचे जेष्ठ पुत्र म्हणजेच वीर बाबुराव शेडमाके .
वीर बाबुराव बालपणापासूनच दयाळू , धाडशी, व प्रामाणिक होते..अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याची क्षमता त्यांच्या अंगी होती..लहाणपणी ते कुश्ती, तलवारबाजी, तिरकामठा, बंदूक चालवणे इ. विद्या शिकून घेतल्या. पुढे ते रायपूरला शिकण्यास गेले.तिथे त्यांना इंग्रजांच्या साम्राज्य विस्ताराची जाणीव झाली..वीर बाबुरावांच्या जमानदारीतही इंग्रजांचा अंमल चालू झाला होता..काही दिवसांनी ते आपल्या स्वगावी परतले.त्यांच्या व्यक्तीमत्वात प्रचंड बदल झालेला होता.परीवर्तनाची दिशा नसानसात भिनली होती.इंग्रजांच्या वरदहस्ताने येथील सावकार जनतेची लूटमार करीत होते.त्यामुळे जनता त्रस्त होती.गरीब, अडाणी आदिवासी जनतेचा फायदा हे सावकार घेत होते.
त्यांचा विवाह झाल्यावर त्यांच्या वडीलांनी जमीनदारीची सर्व जबाबदारी वीर बाबुरावांच्या हातात दिली..तेव्हापासून वीर बाबुराव त्याच्या न्यायी, दयाळू, धाडशी कर्तबगारीला सुरूवात केली..जुलमी इंग्रजांचे पाय चांदागढ पर्यंत पोहचले..त्याची झळ अहेरी जमीनदारीतील जनतेला बसू लागली..तेव्हा ते पेटून उठले..आणि इंग्रजांच्या विरोधात रणशिंग फुंकले..सामान्य जनतेला फसवून लूटमार करणाऱ्या सावकाराविरोधात त्यांनी मोहीम आखली..राजे शंकरशहा सारख्या क्रांतीवीरांची प्रेरणा त्यांच्या पाठीशी होती..आपल्या युवासाथीदारांच्या मदतीने इंग्रजांच्या व सावकारांच्या विरोधात संघर्षासाठी दंड ठोकले..वीर बाबुरावांचे वंदणीय गुरू , मार्गदर्शक क्रांतीवीर महाराजा शंकरशहा व रघुनाथशहा मडावी या पितापुत्रांना जबलपूरच्या चौकात तोफेला बांधून उडवले..या घटनेने वीर बाबुराव प्रचंड संतापला..आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या क्रूरतेने ते व्यथीत झाले..आता या इंग्रजाच्या विरोधात लढण्याशिवाय पर्याय नाही हे समजून चुकले..त्यासाठी त्यांनी ‘ जंगोम ‘ नावाची सेना उभी केली..आपल्या सेना साथीदारांना माहीती देण्याचं काम त्यांनी मोल्लमपल्ली येथे केले..हे स्थान अतिशय कीर्र जंगलाने वेढलेले होते..भारतातून इंग्रजाना हुसकाऊन लावणे हेच आता वीर बाबुराव यांच्या पुढील आव्हान होते. इंग्रज अधिकारी कॕप्टन स्काँट चांदागढच्या किल्ल्याची तटबंदी तोडून किल्ल्यात आपल्या सैन्यासह आलेला होता..त्याचा विरोध राजे भुजंगराव व राजे कोंड्याबाबा यांनी केला.परंतु इंग्रजांच्या सैन्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही.शेवटी चांदागढ राज्य खालसा झाले.जेव्हा आर.एस.एलीस चांदागढच्या जिलाधिकारीपदी रूजु झाले..तेव्हापासून सामान्य जनतेवर जुलूम , अत्याचार सुरू झाले. हे अत्याचार इंग्रजांच्या मदतीने येथील सावकार करू लागले..म्हणून या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी तेथील सावकारांना धडा शिकवण्यासाठी राजगढ वर त्यांनी आपल्या साथीदारांसह हल्ला चढवला..सावकारांच्या मदतीला आलेल्या इंग्रज सैन्याचा वीर बाबुरावांनी प्रतिकार करून विजय प्राप्त केला..त्यांनतर स्काँट बदलून कॕप्टन क्रीक्टन चांदागढला आला.तो अतिशय मग्रूर असा आधिकारी होता.त्यांनी वीर बाबुरावांना पकडण्याचा आदेश आपल्या सैन्याला दिला. इंग्रज सैनिक वीर बाबुरावांच्या मागे लागले..मात्र वीर बाबुराव त्यांना सापडणारा नव्हता .तो अतिशय जोजना बध्द रितीने मोहीम आखणारा योद्धा होता..वीर बाबुरावांनी इंग्रज सैन्याला जर्जर करून सोडलं.त्यामुळे कॕप्टन क्रिक्टन अधीकच क्रोधीत झाला. वीर बाबुराव यांनी राजगढ, घोसरी, गढीसुर्ला आणि सगनापूर या भागात होणाऱ्या अन्यायापासून जनतेची सुटका केली .कॕप्टन क्रिक्टनने पसरविलेल्या टेलीफोन तारांना उखडून टाकण्याचं काम वीर बाबुराव यांच्या साथीदाराने केलं..काही अधिकाऱ्यांना यमसदनीही धाडलं..या घटनेने क्रिक्टन चांगलाच हादरला.त्याला कळून चुकले की, वीर बाबुराव ला पकडणे आता शक्य नाही.
म्हणून त्याने कपटनीतीचा वापर केला..त्याच्या सोबतीला शेक्सपीयर नागपूरहून आला होता..या दोघांनी मिळून कपटनितीचा डाव आखला..वीर बाबुरावांच्या जवळच्या व्यक्तींना फूस देवून त्यांचं आंदोलन संपविण्याचा प्रयत्न चालू केला .मात्र त्यातही यश आले नाही. तेव्हा त्यांनी अहेरी जमीनदारीची मालकीन श्रीमती लक्ष्मीबाई यांना विश्वासात घेवून जमीनदारी शाबूत ठेवण्याचं लालच दाखवून स्वतः च्या कपटनितीला मदत करण्यास बाध्य केले..आणि लक्ष्मीबाई तयार झाली.इथेच सारा घात झाला.
लक्ष्मीबाई ने वीर बाबुरावाना आपल्या घरी जेवायला बोलावले..विश्वासाने वीर बाबुराव निशस्र त्यांच्या घरी आले..आणि आजुबाजुला लपून बसलेल्या शेक्सपियरच्या सैन्याने निशस्त्र वीर बाबुरावला घेरले..वीर बाबुराव इंग्रजांचा कावा लक्षात घेऊन चपळाईने उठला..मात्र तो एकटा असल्यानं काहीच करू शकला नाही.आणि इंग्रज सैन्यानं त्यांना पकडलं. स्वजनानींच घात केला.वीर बाबुराव कैद झाले.शेक्सपियरच्या चेहऱ्यावर मात्र कपटी हास्य उमटले.वीर बाबुराव कपटाने पकडल्याची वार्ता वा-यासारखी पसरली.जनतेच्या मनात इंग्रजांबद्दलचा आक्रोश शिगेला पोहचला..वीर बाबुराव ला कैद करून अहेरीहून त्वरेने चांदागढच्या तुरूंगात आणण्यात आले..आणि कशाचाही विलंब न लावता वीर बाबुरावाच्या फाशीचा दिवस ठरविण्यात आला..
21 आँक्टोबर 1858 रोजी चांदागढच्या जेलमध्ये पिंपळाच्या झाडाला फाशी देण्यात आली.
अशा त-हेने प्राणहितेचा वाघ , गोंडवानाचा योद्धा, देशाचा क्रांतीवीर शहिद झाला. त्यांच्या वीरतेला कोटी-कोटी प्रणाम…!!!

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close