ताज्या घडामोडी

उत्साहात पार पडले अखिल भारतीय “आम्ही लेखिका” संस्थेचे स्नेहमीलन ! आयोजित कविसंमेलनात अनेकांचा सहभाग !

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

महिला लेखिकांचे व्यासपीठ असलेल्या अखिल भारतीय “आम्ही लेखिका” संस्थेचे स्नेहमीलन आणि कविसंमेलन दि.१३ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबईत अतिशय थाटात व उत्साहात पार पडले. गेली दोन वर्षे कोविड मुळे घरात बंदिस्त असलेल्या लेखिकांना मुक्त व्यासपीठ लाभले होते, त्यामुळे सर्वत्र अतिशय उत्साहाचे वातावरण होते. अल्पोपहारानंतर विचार मंथनाला सुरुवात झाली. या वेळी संस्थेच्या कार्याबाबत विचारविमर्श झाले. दरम्यान”आम्ही लेखिका” संस्थेच्या अध्यक्ष प्रा. सुनंदा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जर व्यक्त होण्याची संधीच मिळाली नाही, तर प्रस्थापित लेखिका कशा तयार होणार ? म्हणून प्रस्थापित लेखिकांसोबतच नवीन आणि सर्वच लेखिकांना स्पर्धांचे परीक्षण, सादरीकरण, प्रमुख उपस्थिती, कार्यक्रमाचे अध्यक्ष अशी पदे देऊन त्यांचा उत्साह आणि ऊर्जा वाढविण्यासाठीच ही संस्था कार्यरत आहे. गेले अनेक महिने नियमित साहित्य उपक्रमांसोबत अनेक साहित्य स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. नवोदितांना मार्गदर्शन होत आहे. सहभागीना प्रमाणपत्रे दिली जात आहेत. यामुळे निश्चितच लेखणी लिहिती राहण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
यावेळी जेष्ठ लेखिका अंजना कर्णिक, पुष्पा कोल्हे यांनीही आपले विचार व्यक्त केले. संस्थेच्या तांत्रिक बाबींवर संस्था समन्वयक शिल्पा देवळेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात प्रियदर्शिनी नाबर यांच्या अध्यक्षतेखाली, ज्येष्ठ कथा लेखिका गौरी गाडेकर आणि अंजना कर्णिक
यांच्या प्रमुख उपस्थितीत कविसंमेलनाला सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवयित्री पुष्पा कोल्हे यांनी उत्तमरित्या केले.

सविता काळे यांनी “लेक माझी सासुरवाशीण” या कवितेने कवीसंमेलनाची बहारदार सुरुवात केली.
“झोका माझा उंच / वर खाली जाई
आभाळाला हात लावण्या मन अधिर होई”
या ओळींनी विशेष दाद घेतली .
युवा कवयित्री रेणूका पांचाळ हिने “कृष्णसखा” सादर करताना
“दिसतो मजला कृष्ण सावळा
सांज गारवा उरी जिरताना
मीरेच्या कवनात अचानक
मेघांचा मल्हार बरसता”
अशी रंगागंधाची पखरण केली.

शिल्पा देवळेकर यांची “क्षितिजरेषा” ही मुक्तछंदातली कविता विशेष दाद घेऊन गेली.
“क्षितिजरेषा ओलांडून मी निघाले
भावनांचा निचरा करून
नितळ नभाच्या दिशेने
जीवनाचा अर्थ नव्याने शोधण्यासाठी”
ह्या त्यांच्या ओळींना चांगलाच प्रतिसाद मिळाला.

पूनम अरणकले – यांनी “शिवधनुष्य ” ही कविता सादर केली.
“सुख दु:खांच्या मेळे आयुष्य हे हिंदोळे
कधी गर्जती वादळे कधी इंद्रधनुष्य”
असे विचार त्यांनी व्यक्त केले .
जयश्री चुरी – यांची खुसखुशीत “आयुष्याचे पिकले पान” ही कविता विशेष विचार देती झाली.

शोभा कुलकर्णी यांनी- ” आलं भरून आभाळ ” ही कविता म्हटली.
“नको नकोरे मना तू तुझे थिटेपण दावू
निसर्गाच्या उत्सवाला गालबोट नको लावू” या सुंदर ओळींना छान दाद मिळाली .

अंजना कर्णिक – यांनी त्यांच्या ‘निर्लेप’ कवितेत
“हा निरोप आता घेतो
मम श्वास सुखाचे झाले
या देहा धरेस देतो
मी रूप वृक्षाचे ल्याले”
हा भाव प्रकट केला.

पुष्पा कोल्हे – यांनी अप्रतिम सूत्रसंचालन करून “घडवू नवेच पर्व” ही कविता सादर केली.
“रंग वेगळे रूप वेगळे गुणवंत इथली मुले
बागेमधल्या विविध ताटवी फुलली जणू की फुले”
या ओळी बालकदिनाच्या पूर्वसंध्येला उद्घृत केल्या.

संस्थेच्या अध्यक्ष प्रा. सुनंदा पाटील यांनी “मी शिळा होणार नाही” ही मुक्त छंदातली कविता सादर केली.
“अहल्ये का भोगलंस तू शिळापण / तुझी काहीही चूक नसताना”
हा सरळ प्रश्नच त्यांनी विचारला. श्रोत्यांच्या आग्रहास्तव त्यांनी एक गझलही सादर केली.

गौरी गाडेकर यांनी ‘सैनिकधवा’ ही कविता सादर केली.

“वरवेष उतरला नाही, गुंडाळून परि तिरंगा
विवाहवेदीवरूनच
हा तडक जातसे स्वर्गा”

हे ऐकताच यावेळी सर्व लेखिका अंतर्मुख झाल्या. अंगावर शहारे आले.

प्रियदर्शिनी नाबर यांनी अध्यक्षीय समारोप करीत- “चांदवेळ” ही अप्रतिम कविता सादर केली. त्यांच्या –
“माझ्या पापणीच्या आड
त्याचे रूप मी कोंडले
स्वप्नातच घरभर
पुन्हा चांदणे सांडले”
या अष्टाक्षरीने कवी संमेलनाची सांगता झाली.

रेणूका पांचाळ सदस्य केंद्रिय कार्यकारिणी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. अशा कार्यक्रमांनी सतत लेखनाची उर्जा मिळत राहते, असे विचार यावेळी अनेक लेखिकांनी व्यक्त केले. कार्यक्रमानंतर सर्वजणी पुन्हा एकदा चार्ज होऊन पुन्हा भेटीची आश्वासने घेत आनंदाने व समाधानाने घरी परतल्या !

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close